*चर्च ऑफ क्राइस्ट दौंड*
🌹 *सेवा कार्याचे बाळकडू देणारी मंडळी*🌹
चर्च ऑफ क्राइस्ट दौंड मंडळीच्या शतक महोत्सवासाठी व या मंडळमधूनच घडलेला सेवक या नात्याने लिखाण करीत असताना खरोखर अंत:करण भरून येते. कॉन्फरन्स क्षेत्रातील सर्वाधिक पाळक,मिशनरी,सुवार्तिक व बायबल वूमन घडविणारी मंडळी जर कोणती असेल तर ती चर्च ऑफ क्राइस्ट दौंड या मंडळीचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. अनेकांना पवित्र शास्त्र आधारित जीवन जगण्यासाठी ज्या मंडळीने तयार केले, घडवले, वचना द्वारे व वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन दिले ती ही मंडळी. आज ह्या मंडळीचा शतक महोत्सव असल्याने ज्या मंडळीमध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या मंडळी विषयी या लिखाणाद्वारे कृतज्ञता व्यक्त करत आहे.मी व माझे कुटुंब आपणांसर्वास या शतक महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो व या मंडळाद्वारे अनेक स्वर्गाच्या राज्यासाठी तयार व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
*माझे संडेस्कुलमधील जीवन*
तसं माझा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई या शहरातील. वयाच्या सहा सात वर्षापर्यंत मी वाईमधील मिशन हॉस्पिटलमध्ये लहानाचा मोठा झालो. काही कारणास्तव 1989-90 झाली मला व आई-वडिलांना वाई सोडून दौंड येथील अश्वूड मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी यावे लागले. आई-वडिलांना मिशन हॉस्पिटल मध्ये नोकरी मिळाली व तेथून या मंडळीशी माझा संबंध आला. दर प्रभूवारी संडे स्कूल जाणं हे माझ्यासाठी होत राहील. मिसेस शालिनी पवार या त्यावेळेस संडे स्कूल सुपरिंटेंडेंट होत्या.वचनाचे बाळकडू या संडे स्कूल मधून मला मिळू लागले.वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी या ठिकाणी मिळू लागली व्हिबीएस काय असतं? हे या मंडळी मध्ये आल्यानंतर मला कळालं. मोठ्या आनंदानं या व्हिबीएस मध्ये मी सहभागी होत राहिलो. पवित्र शास्त्र वाचनाची व अध्यात्माची गोडी याठिकाणी मला लागली. जसजसा संडे स्कूल मध्ये मोठ्या वर्गात जाऊ लागलो तस तशी जबाबदारी आणखी वाढत गेली. मला आठवतं आमची वरीष्ठ वर्गाची सहल पुण्यातील यूबीएस या सेमिनरी मध्ये गेली.त्यावेळेस संपूर्ण जाण्या येण्याची व पैशाचा जमाखर्च याची जबाबदारी बाईंनी मला पहिल्यांदा दिली. ही जबाबदारी पार पाडत असताना मनात भीती होती.पण ती व्यवस्थितपणे पार पाडली. नेतृत्वाचं कौशल्य असावं व ते ख्रिस्त केंद्रित असावं हा विचार पहिल्यांदा संडे स्कूल मध्ये मिळाला. आईच्या घराण्याकडून संगीत क्षेत्राचा वारसा मिळाल्याने काही वाद्य संडे स्कूल मध्ये वाजवू लागलो.काही कामांमध्ये पुढाकार घेऊ लागलो देवबापाने अतिशय सुंदर रीतीने संडे स्कूलच्या माध्यमातून माझी जडणघडण केली. वरिष्ठ वर्गापर्यंत अनेक उत्तम शिक्षकांच्या हाताखालून गेलो प्रत्येक संडे स्कूल शिक्षकाचे माझ्या आत्मिक जीवनामधील योगदान मी कधीच विसरू शकत नाही. त्या सर्वांचे मनापासून आभार.
*तारुण्यातील सहभाग व थिओलोजीकल प्रशिक्षण*
जसजसे तारुण्याच्या उंबरठ्यावर मी येत होतो तसेच जगिक गोष्टींकडे पण ओढला जात होतो पण एक महत्त्वाची गोष्ट मिशन मध्ये राहत असताना घडली ती ही लहानपणीच सन्माननीय बी.ए तिवारी पाळकसाहेब व त्यांचे कुटुंब हे शेजार म्हणून मिळाले कळत नकळत पाळकसाहेबां कडील सेवाकार्याचा व त्यांच्याकडे असणार्या दैवी ज्ञानाचा पकडा माझ्यावर उमटत गेला. तरूण संघात असताना क्वायर,भजने,नाटके, सुवार्ता कार्य, गुड फ्रायडे व पुनरुत्थान दिनानिमित्त साक्षीच्या आठवड्यामध्ये चलत चित्रपट इतरत्र घेऊन जाऊन सुवार्ता कार्य करणे, आजा-यांना फळवाटप,मंदिराची साफसफाई,मंडळीतील प्रत्येक साप्ताहिक कार्यक्रमांमध्ये न चुकता भाग घेऊ लागलो. टॅफ्टिचे वर्ग करणे, नाताळचे बक्षिसे आणण्यासाठी पुण्याला जाणे, चर्च डेकोरेशन मध्ये मदत करणे अशा अनेक व विविध सेवाकार्याचेद्वारे माझी घडण होत गेली. काय बरोबर काय चूक हे पालक साहेब मला वैयक्तिक रीतीने समजावून सांगत. अकरावी-बारावीत असेल त्यावेळेस व्हिबीएस मध्ये स्वयंसेवकाची व गीते शिकवण्याची जबाबदारी व वेगवेगळ्या विधर्मी लोकांमध्ये असणाऱ्या व्हिबीएस ची जबाबदारी पाळक साहेबांनी माझ्यावर सोपवली तसेच नसरापुर याठिकाणी संडे स्कूल टीचर ट्रेनिंग साठी मला व माझ्या सोबत आणखी काही जणांना पाठवले. नसरापूर याठिकाणी पहिल्यांदा मला असे जाणवले की प्रभू मला पूर्णवेळ सेवेसाठी बोलावत आहे. त्याअगोदर केडगाव येथील मुक्ती मिशनच्या रिट्रीट सेंटरमध्ये पहिल्यांदा पूर्णपणे सेवेसाठी मी समर्पण केले होते त्याची पूर्णता नसरापुर याठिकाणी झाली.
मला आठवते नसरापुर या ठिकाणावरून आल्यानंतर दौंडच्या चर्च मधल्या पुलपिटच्या मागे लपून मी पश्चाताप केला व माझे जीवन पूर्णपणे ख्रिस्ताला दिले व त्याच दिवशी पाळक साहेबांना भेटून मी सेवेविषयी जाण्याचा माझा विचार त्यांना प्रकट केला. पूर्णवेळ सेवेला जाण्याविषयी ची माझी सर्व कारणे ऐकल्यावर पालक साहेबांनी अवघ्या एका आठवड्यात वाय सी एल टी यवतमाळ सेमिनरी या ठिकाणाहून फॉर्म मागून तो माझे कडून भरून घेतला. कॉन्फरन्स ने मला पाळकिय या प्रशिक्षणासाठी स्पॉन्सर केले व सन 2000 व 2001 यावर्षी मी पाळकिय प्रशिक्षणासाठी यवतमाळ या ठिकाणी गेलो.2003-2004 या वर्षी प्रशिक्षण पुर्ण करून परत आलो.या काळात मंडळीतील अनेकांनी मला सहकार्य केले त्यांचा मी आजन्म ऋणी आहे.या 3ते4 वर्षा मध्ये सुट्टी मध्ये मला प्रॅक्टिकल साठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवित असत कधी भिगवण,साखरवाडी,ढोरजे भांनगाव,श्रिगोंदा,टाकळी,दौंड च्या आजूबाजूला असणारी खेडी वस्ती जसे मलठण,बोरीबेल,काष्टी व इतर या ठिकाणी सेवेची संधी मिळाली.
मी नुकताच माझे थिऑलॉजिकल प्रशिक्षण पूर्ण करून नाताळनिमित्त दौंड ला आलो असताना मला नाताळाची भक्ती घेण्यासाठी पाळक साहेबांनी भिगवण या ठिकाणी पाठविले. मनात कालवाकालव होत होती की नाही म्हणावे कारण तीन वर्षानंतर चा नाताळ आई-वडिलांबरोबर साजरा करायचा होता पण पाळक साहेबांच्या एका वाक्याने मनाचा ठाव घेतला *,"आता घरी थांबायचं नाही तर सेवेसाठी बाहेर पडायचं".* मी आनंदाने जाऊन भिगवन मिशनठाण्यात नाताळाची भक्ती घेतली.
2003 पासून ते आज पावेतो अनेक वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या स्तरावर देवाच्या वचनाची सेवा केली. ढोरजे,बारामती येथील सत्याचा मार्ग, चर्च ऑफ क्राइस्ट बारामती व सद्य अलायन्स मराठी चर्च भुसावळ या ठिकाणी सेवा करीत आहे पण दौंड मंडळीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.त्या ठिकाणी मिळालेली प्रत्येक गोष्ट ही मूल्यवान होती. जो सहवास,मित्र,प्रोत्साहन,वचनाचे बाळकडू,नेतृत्वाचे कौशल्य मिळाले व सर्वात अलौकिक म्हणजे माझे तारण याच मंडळीत झाले. मी त्या थोर परमेश्वराचे आभार मानतो एका विशिष्ट उद्देशाने त्याने माझे दौंड येथे येणे होऊ दिले.त्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे ज्यांनी माझ्या कुटुंबामध्ये व माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये योगदान दिले.माझे कुटुंब तुम्हाला कधीच विसरू शकत नाही व आपण नाही विसरणार नाही हा विश्वास ठेवतो. व पुन्हा एकवार मंडळीस व आपणा सर्वास या शतक महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो व आपली अधिकाधिक वृद्धि करो.
रेव्ह.स्वप्निल पिटर नाशिककर
प्रिस्ट इंचार्ज
अलायन्स मराठी चर्च भुसावळ.
भ्रमणध्वनी
9762784107.
No comments:
Post a Comment